Latur

कन्या विद्यालयातील शालेय पोषण आहार प्रकरणी प्रभारी मुख्याध्यापिकस बडतर्फ करण्याची मागणी…

कन्या विद्यालयातील शालेय पोषण आहार प्रकरणी प्रभारी मुख्याध्यापिकस बडतर्फ करण्याची मागणी…

लातुर : उदगीर येथील शामार्य कन्या विद्यालयातील शालेय पोषण आहार चोरी प्रकरणी प्रभारी मुख्याध्यापिकेस बडतर्फ करून संबंधित मुख्याध्यापिकेची पाठराखण करणाऱ्या जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी लातूरचे जिल्हाधिकारी श्री. जी. श्रीकांत यांना दि. २९ ऑक्टोंबर रोजी भेटून दिले आहे.
उदगीर येथील शामार्य कन्या विद्यालयातील प्रभारी मुख्याध्यापिकेने एक ते दीड क्विंटल शालेय पोषण आहार चोरून घरी घेऊन जात असले बाबतची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी यांना व्यंकटराव पनाळे यांनी दिली आहे.
उदगीर शहरातील बहुचर्चित आणि नामांकित कन्या विद्यालया मधील प्रभारी मुख्याध्यापिका यांनी शालेय पोषण आहार शाळेतून चोरून घेऊन घराकडे अँटोरिक्षा मधून जात असताना काही लोकांनी प्रत्यक्ष पाहिले व शालेय पोषण आहार घेऊन जात असलेल्या ॲटोरिक्षाचे फोटोही काढून घेतले. आणि सदरची माहिती उदगीर येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयास कळवली. त्यानंतर उदगीरच्या गट शिक्षणाधिकारी कार्यालयातून शालेय पोषण आहार चोरून घेऊन जात असलेल्या मुख्याध्यापिका बाईला फोनवरून एका अधिकारी बाईने ऑटोरिक्षाचा पोलीस पाठलाग करत असल्याचे कळवल्यामुळे या प्रभारी मुख्याध्यापिका बाईने घाबरून जाऊन ऑटोरिक्षा शाळेकडे परत नेऊन चोरून घेऊन जात असलेला एक ते दीड क्विंटल शालेय पोषण आहार परत शाळेत आणून शाळेचा सेवक हनुमंत मरे कडून उतरवून घेतला. याही वेळेस अनेक लोकांनी ज्या ॲटोतून शालेय पोषण आहार प्रभारी मुख्याध्यापिका घेऊन गेल्या होत्या तोच परत येऊन शाळेत उतरवत असतानाही लोकांनी पाहिले. आणि वार्ता शहरात पसरताच शाळेजवळच बघ्यांची गर्दी झाली. दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन या प्रकरणात उदगीरचे गट शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी चौकशी केली आहे. तसेच पंचनामा केला आहे, मात्र पुढे काय झाले हे अजून गुलदस्त्यातच आहे ?
गटशिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांना फोनवरून चौकशी केली असता हा विषय गोपनीय असल्यामुळे सांगता येत नाही असे उडवाउडवीची उत्तरे दिली ? शालेय पोषण आहाराची चोरी प्रकरण यात गोपनीयता असण्याचे नेमके कारण काय ? हे प्रकरण मलिदा खाऊन मिटवले जाणार अशी शंका येते !
कारण प्रभारी मुख्याध्यापिका बाईची बेकायदेशीरपणे व नियमबाह्य मुख्याध्यापक पदाची कायमची ऑर्डर काढण्यासाठी
माध्यमिक शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांनी पैसे घेऊन प्रभारी मुख्याध्यापिका बाईंची कायम मुख्याध्यापिका अशी ऑर्डर लिहून स्वाक्षरी करून सुद्धा ठेवली आहे. बाकी व्यवहार पूर्ण होताच ती ऑर्डर त्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे अशी बेकायदेशीर व नियमबाह्य ऑर्डर देणाऱ्या शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांच्यावरही कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव पनाळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे असे बेकायदेशीर काम करणारे शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे त्यांच्याकडून या शालेय पोषण आहार चोरी प्रकरणात कांही कार्यवाही होईल असे वाटत नाही. गटशिक्षणाधिकारी फुलारी आणी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे कांही कार्यवाही करतील अशी अपेक्षा सुद्धा बाळगू नका ! असे खाजगीत जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याने व एका जिल्हा परिषदेच्या सन्माननीय सदस्यांनी त्यांच्या पूर्व अनुभवावरून सांगितले असल्याचा हि उल्लेख या निवेदनात केलेला आहे. मात्र उदगीर शहरातील तमाम जनतेचे आणि प्रभारी मुख्याध्यापिका बाई शालेय पोषण आहार चोरून घेऊन जात असताना व परत शाळेत आणून ठेवत असताना पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे या प्रकरणाकडे विशेष लक्ष आहे. विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार हडप करणाऱ्या या प्रवृत्तीवर वेळीच कार्यवाही होणे गरजेचे आहे अन्यथा शालेय पोषण आहार चोरी प्रकरणात वाढ होत राहील. जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे शालेय पोषण आहार चोरीचे प्रकार घडत आहेत आणि ते प्रकार होत राहतील. तेव्हा जिल्हाधिकारी यांनी शालेय पोषण आहार चोरणाऱ्या मुख्याध्यापिकेस बडतर्फ करून पाठराखण करणारे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांच्यावरही कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे, संभाजीराव आयनिले, सादिक शेख, वीरणाथ अंबुलगे, दयानंद चव्हाण यांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button