Aurangabad

धक्कादायक! रस्ता नसल्याने खाटेवरून न्यावा लागला मुलाचा मृतदेह

धक्कादायक! रस्ता नसल्याने खाटेवरून न्यावा लागला मुलाचा मृतदेह

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील उपळी या गावातील उपळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाघदावाडी येथील तुषार विठ्ठल महेर या मुलाचा सिल्लोड येथे चार दिवसांपूर्वी वळण रस्त्यावर अपघाती मृत्यू झाला होता. या वाघदावाडी या गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्याने चक्क मृतदेह खाटेवरून नेण्याची वेळ या कुटुंबीयांवर आली आहे.

सिल्लोड तालुक्यातील उपळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाघदावाडीची लोकसंख्या तिनशेपेक्षा जास्त आहे. ग्रामपंचायतमध्ये येथील एक सदस्य निवडून येतो. मात्र, या गावात पाण्याची सोय नाही. आपापल्या परीने नागरिक पाण्याची व्यवस्था करतात. येथे जाण्यासाठी अद्यापही रस्ता नसल्यामुळे रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी खुप कसरत करावी लागते. तसेच रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी खाटेचा वापर करावा लागतो.

सध्या पावसाळा सुरू आहे त्यामुळे पावसाळ्यात तर महिलांसह लहान मुले, वयोवृद्ध व्यक्तींना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. चार दिवसांपूर्वी वाघदावाडीच्या तुषार विठ्ठल महेर या मुलाचा सिल्लोड येथे रस्ता अपघात झाला होता या अपघातात विठ्ठल महेर याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह गावी नेण्यासाठी कुटुंबीयांना खाटेचा आधार घ्यावा लागला. यामुळे गावात रस्ता कधी होईल, अशी विचारणा गावकरी करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button