Yawatmal

? शिवसेनेच्या खासदार भावना गवळी सह 9 जणांविरुद्ध गुन्हा, काय आहे नेमकं प्रकरण ?

? शिवसेनेच्या खासदार भावना गवळी सह 9 जणांविरुद्ध गुन्हा, काय आहे नेमकं प्रकरण ?

यवतमाळ : शिवसना खासदार भावना गवळी यांच्यासह माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार विधानसभा प्रमुख संतोष ढवळे , महेश पवार यांच्यासह 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासदार भावना गवळी यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांवर गैरकायद्याची मंडळी जमवणे, अंगावर जाणे, मारहाण करणे प्रकरणी असे आरोप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याच्या मागणीसाठी शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्त्वात जबाब दो आंदोलन करण्यात आलं. मात्र, यावेळी पीकविमा कंपनी इफको टोकियोच्या जनरल मॅनेजरला मारहाण करण्यात आली होती.
आता हे प्रकरण पोलिसांत गेलं आहे.

शिवसेना घाबरणार नाही..

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही आंदोलन केले असता आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्याला शिवसेना घाबरणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे कंपनी देत नाही, तोपर्यंत आम्ही कंपनी विरोधात आक्रमक भूमिका घेत आमचं आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं खासदार भावना गवळी यांनी सांगितलं आहे.

काय आहे प्रकरण?

यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामामध्ये अतोनात नुकसान झालं. मात्र, विमा कंपनीने मोजक्याच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली. उर्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात, यावी यासाठी शिवसेना खासदार भावना गवळी यांनी विमा कंपनीवर मोर्चा काढला होता. मात्र, यावेळी मॅनेजरनं समाधानकारक उत्तर दिलं नाही. त्याचा राग आल्यानं संतप्त झालेल्या संतोष ढवळे यांनी मॅनेजरला बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे हा प्रकार खासदार भावना गवळी यांच्यासमोरच घडला. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी खरीप हंगामात यवतमाळ जिल्ह्यातील 4 लाख 67 हजार 21 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. त्यासाठी या शेतकऱ्यांनी 158 कोटी रुपयांचा भरणा केला. दुर्दैवानं अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला. अशा परिस्थितीतही विमा कंपनीने 9 हजार 776 शेतकऱ्यांनाच नुकसान भरपाई दिली. उर्वरित 4 लाख 57 हजार 245 शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली. या शेतकऱ्यांना सुद्धा नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. याबाबत संसदेमध्ये आवाज उठवू, असा इशारा खासदार भावना गवळी यांनी आधीच दिला होता.

शेतकऱ्यांच्या विम्याच्या मागणीसाठी काल खासदार भावना गवळी यांनी स्थानिक स्टेट बँक चौकातून जवाब दो आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर आंदोलक जाब विचारण्यासाठी विमा कंपनीच्या कार्यालयात गेले. या ठिकाणी मॅनेजरने समाधानकारक उत्तर न दिल्याने यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे चांगलेच संतापले आणि त्यांनी मॅनेजरला खुर्चीतून ओढून मारहाण केली. त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत शिवसैनिकांना शांत केलं.

दरम्यान, आजच्या या आंदोलनात जिल्ह्यातील हजारो शेतकरी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान विमा कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मात्र या आंदोलनातून सेनेतील गटबाजी उघड झाली झाली. पालक मंत्री संजय राठोड यांचा कोणत्याही बॅनरवर फोटो वापरण्यात आला नाही. या शिवाय पालकमंत्री गटाचा एकही पदाधिकारी आंदोलनावेळी तिकडे फिरकला नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button