Bodwad

मुख्याधिकाऱ्यांच्या बनावट सहीने मिळवली बांधकामाची परवानगी

मुख्याधिकाऱ्यांच्या बनावट सहीने मिळवली बांधकामाची परवानगी
योगेश पावर बोदवड
बोदवड : बोदवड येथील नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांची बनावट सही करून बांधकाम परवानगी मिळवून प्रशासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी २७ रोजी येथील पोलिस ठाण्यात संबंधित अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान हा प्रकार लक्षात येताच येथील नगरपंचायतीचे मुख्याधिकाऱ्यांनी जमीन मालक प्रतिभा अनिल कोकाटे यांना बनावट बांधकाम प्रकरणी खुलासा सादर करण्याबाबत नोटीस दिली होती. त्यानुसार प्रतिभा कोकाटे यांनी खुलासा सादर करून सिव्हिल इंजिनिअर अमोल शिरपूरकर यांनी १२ हजार रुपये घेऊन नगरपंचायतीत माझे काम लवकर होते, मी तुम्हाला बांधकाम परवानगी व कर्जासाठी लागणारे कागदपत्र काढून देतो. असे सांगत बांधकाम परवानगी आणून दिल्याचे सांगितले. दरम्यान २४ फेब्रुवारी रोजी कोकाटे यांनी सदर घर स्वप्निल विलास सोनवणे यांना विकले आहे. तसे खरेदी खतही लिहून दिले आहे. या बांधकामावर संबंधितांनी बँकेचे कर्ज देखील काढल्याचा खुलासा सादर करण्यात अाला आहे. त्यानुसार नगरपंचायत प्रशासनाने महाराष्ट्र बँकेच्या शेलवड शाखा कार्यालयास नगरपंचायत कार्यालयातील एक बांधकाम परवानगी बनावट आढळल्याने बांधकाम परवानगी प्रत पडताळणीसाठी उपलब्ध करून द्यावी, या बाबत पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार महाराष्ट्र बँकेच्या शेलवड शाखेचे मितेश मुरलीधर अग्रवाल यांनी कागदपत्र सादर केले. त्याची पडताळणी केली असता सदर बांधकाम परवानगी बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे नगरपंचायतीचे स्थापत्य नगर अभियंता रितेश बच्छाव यांच्या फिर्यादीवरून २७ रोजी येथील पाेलिस ठाण्यात आराध्या कन्स्ट्रक्शन व आर्किटेक्टचे अमोल शिरपूरकर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड करत असून या प्रकाराची शहरात गुरुवारी दिवसभर चर्चा सुरू हाेती. दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासाकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
अभियंत्याने अशी केली फसवणूक
बोदवड येथील आराध्या कन्स्ट्रक्शन व आर्किटेक्टचे इंजिनिअर अमोल शिरपूरकर यांनी २० मे पूर्वी वेळ नक्की नाही नगरपंचायतीचे बांधकाम परवानगी बाबत बनावट कागदपत्रे तयार केली व त्यावर बनावट शिक्के व सह्या करून सदर बनावट कागदपत्रांचा वापर करून शासनाची फसवणूक केली आहे. तसेच नगरपंचायतीला बांधकाम परवानगी शुल्कातून मिळणारा १ लाख २२ हजार ८९७ रुपयांचा शासकीय महसूल बुडवला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button