Nandurbar

राष्ट्रसेवेच्या भावनेने मतदार जागृतीत सहभागी व्हावे ! जिल्हाधिकारी मनीषा खत्री

राष्ट्रसेवेच्या भावनेने मतदार जागृतीत सहभागी व्हावे ! जिल्हाधिकारी मनीषा खत्री

फहिम शेख/नंदुरबार

नंदुरबार दि. 25: लोकशाहीचा पाया भक्कम करण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. युवक आणि नागरिकांनी राष्ट्रसेवेच्या भावनेने मतदान करावे आणि मतदार जागृतीच्या कार्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले.

तहसिल कार्यालय नंदुरबार येथे आयोजित राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसिलदार रिनेश गावीत आदी उपस्थित होते.

श्रीमती खत्री म्हणाल्या की, निवडणूक प्रक्रियेत मतदार नोंदणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे नव युवकांनी मतदार जनजागृतीसाठी स्वत: व इतर नागरिकांना प्रोत्साहित करुन मतदार नोंदणी व मतदानाचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न करावा. नागरिकांनीही मतदानात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन लोकशाही अधिक बळकट करावी.

सहायक जिल्हाधिकारी करनवाल म्हणाल्या की, आज 18 वर्षांवरील नव मतदारांना प्रथम ई-पीक कार्ड मिळाले असून योग्य उमेदवार निवडून देशाचे उज्वल भविष्य घडविण्याची खुप मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे त्यामुळे नवमतदारांनी स्वत: मतदानात सहभाग घ्यावा व इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. निबंध स्पर्धा, वकृत्वस्पर्धा, रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धांमध्ये विजेत्या झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात नवमतदारांना ई-पीक अर्थात इलेक्ट्रॉनिक ओळखपत्राचे वाटप मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदार जागृतीची शपथ घेण्यात आली.

प्रारंभी जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. श्रीमती खत्री यांनी रांगोळी स्पर्धेत विजेत्या झालेल्या विद्यार्थ्यांनी रेखाटलेली रांगोळी तसेच चित्रकलेची यावेळी पाहणी केली.

प्रास्ताविकात श्री. थोरात म्हणाले की, मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा, मतदारांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी 25 जानेवारी रोजी देशभरात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मतदारांना विशेषतः नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे, तसेच राष्ट्रीय मतदार दिवस आयोजनाबाबत माहिती दिली.

सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन रिनेश गावीत यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button