Bollywood

Bollywood: लता दिदीं वर झाला होता विष प्रयोग..पहा काय होती घटना…

Bollywood: लता दिदीं वर झाला होता विष प्रयोग..पहा काय होती घटना…

लता मंगेशकरांचा अजरामर स्वर फार पूर्वीच कायमचा आवळून टाकायचा प्रयत्न झाला होता. त्या खळबळजनक विषप्रयोगापासूनही तावून सुलाखून झळाळला होता हा स्वर्गीय स्वर.

मुंबई, 06 फेब्रुवारी: लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला असला, तरी त्यांच्या अलौकिक आवाजाचं गारुड रसिकांवर कायम राहणार हे निश्चित. वयाच्या 92 व्या वर्षी जवळपास महिनाभर रुग्णालयात लतादीदी मृत्यूशी झुंज देत होत्या. ती झुंज अपयशी ठरली. पण ही काही त्यांनी मृत्यूला दिलेली पहिली झुंज नव्हती. लतादीदींचा आवाज कायमचा बंद करून टाकायचा प्रयत्न चार दशकांपूर्वीच झाला होता. त्यांच्यावर विषप्रयोग झाला होता. त्यातून त्यांचा स्वर तावून सुलाखून झळाळून उठला आणि त्या नव्वदीपर्यंत अविरत गात राहिल्या.

अगदी सामान्य परिस्थितीतून अपार मेहनतीने त्यांनी कष्ट करून आघाडीची पार्श्वगायिका म्हणून स्थान निर्माण केलं. इथपर्यंत पोहोचण्याचा आणि ते स्थान शेवटपर्यंत टिकवण्याचा प्रवास सहजसाध्य नव्हता. एकेकाळी या गानसम्राज्ञीवर विषप्रयोग झाला होता. या घटनेबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नसेल. मंगेशकर कुटुंबही याबाबत फारशी वाच्यता करत नाहीत. पण ज्या वेळी लतादीदींचं गाणं ऐन बहरात येत होतं, त्याच वेळी हा सुमधूर आवाज कायमचा बंद करण्याचा प्रयत्न झाला होता. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये लता मंगेशकर यांनी ही माहिती दिली होती.

ही घटना घडली होती भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात. एक दिवस सकाळी लतादीदी अचानक आजारी पडल्या. त्यांचं पोट दुखायला लागलं. आणि हिरव्या रंगाची उलटी झाली. त्यानंतर त्या तीन महिने गाऊ शकल्या नव्हत्या.

लतादीदींनी हे सगळं लेखिका पद्मा सचदेवना सांगितलं होतं. ‘ऐसा कहां से लाऊँ’ या पुस्तकात याचा उल्लेख आहे. त्यावेळी लतादीदींना वेदना असह्य झाल्या होत्या. डॉक्टरांनी त्यांना गुंगीचं इंजेक्शन दिलं होतं. लतादीदींना कमालीचा अशक्तपणा आला होता. मृत्यूशी झुंज देऊनच त्या वाचल्या होत्या. आयुष्यातला सर्वात वाईट काळ होता तो लतादीदींच्या.

डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे लतादीदींवर स्लो पॉयझनिंग झालं होतं. अर्थात, संशयाची सुई जवळच्या व्यक्तींकडेच होती. त्यांच्या घरच्या आचाऱ्याला या प्रकरणी संशयी मानलं गेलं. कारण लतादीदी आजारी पडल्यावर तो आचारी न सांगता घर सोडून गेला. अगदी पगारही त्यानं घेतला नाही. त्यानंतर लतादीदींच्या जेवणाची सर्व जबाबदारी उषा मंगेशकरांनी घेतली. स्वयंपाकघर सांभाळण्याचं काम त्यांनी स्वतः शेवटपर्यंत केलं.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button