Maharashtra

छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने अपंग आणि निराधारांना किराणा व अत्यावश्यक वस्तूंचे वाटप

छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने अपंग आणि निराधारांना किराणा व अत्यावश्यक वस्तूंचे वाटप

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे

कोरोना सारख्या महामारीने संपूर्ण जगाला वेढल्यामुळे या जागतिक संकटावर मात करण्यासाठी राज्य आणि देशपातळीवर विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अश्या या कठीण परिस्थिती मध्ये संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे सर्वसामान्य माणसांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हातावर पोट असणाऱ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली असतानाच, सामाजिक बांधिलकी जपणारे, गरिबीची जाण आणि भान असणारे, गरिबांचे कैवारी, समाजहित जोपासणारे, सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे शिवश्री रामभाऊ पवार यांनी छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून परांडा तालुक्यातील गरजू जनतेला किराणा माल आणि अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करून समाजऋण फेडण्याचा प्रयत्न केला आहे.

परंडा तालुक्यातील हातावर पोट असणाऱ्या आणि या संकटकाळी उपासमारीला तोंड देत असलेल्या परंडा आणि सोनारी येथील, अपंग ( अस्थिव्यंग ) आणि निराधार ( बिनशेती ) अश्या १०० कुटुंबांना तांदूळ, आटा, साखर, डाळ, हळद, मसाला, तिखट, मीठ, साबणआदी प्रकारच्या अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी श्री क्षेत्र सोनारी येथील श्री भैरवनाथ मंदिरातील मठाधिपती श्री महंतापीर योगी शामनाथजी महाराज यांच्या हस्ते,प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा शिवश्री रामभाऊ पवार, संस्थापक अध्यक्ष शिवश्री धनंजय वळेकर, धिरज शेळके, पत्रकार अजय पवार, महेश ठोंगे, भागवत तनपुरे, एव्हरेस्ट देशमुख यांच्या उपस्थितीत शासकीय नियमांचे पालन करत साहित्याचे वाटप करण्यात आले.

त्याचबरोबर संपूर्ण देशात धुमाकूळ घातलेल्या कोरोनासारख्या महामारीतून आपल्या देशवासियांना वाचविण्यासाठी स्वतःचे जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा करणाऱ्या वारदवाडी चौक येथे जिल्हा हद्दीवर सेवेसाठी तैनात असलेल्या, भर उन्हामध्ये उभा राहून आपल्या देशातील जनतेच्या रक्षणासाठी कोरोनाशी लढा देण्याचं कार्य करत असलेल्या पोलिस बांधवांचा निष्ठावंतपणा यावेळी डोळ्यात पाणी आणत होता. आपल्या कुटुंबाची, नातेवाईकांची व स्वतःची कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, कंपाउंडर, सफाईकामगार, आर्मी, पोलीस, पत्रकार, पालिका कर्मचारी दिवसरात्र कोरोनाशी दोन हात करत आहेत. जनतेच्या संरक्षणासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या या देवदूतांना देवापेक्षा मोठी उपमा दिली तरी वावगी ठरणार नाही. यावेळी रामभाऊ पवार यांनी येथील देवदूत बनून रक्षा करणाऱ्या पोलिस बांधवांना पाणी बॉटल, बिस्किटे, फरसाण आणि ड्रायफ्रुट देऊन त्यांचे आभार मानले. या उपक्रमाचे कौतुक संपूर्ण परंडा तालुक्यातून आणि परिसरातून केले जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button