नांदेड

महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या, इंडियन पँथर सेनेचे राज्यपालांना निवेदन

महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा
शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या, इंडियन पँथर सेनेचे राज्यपालांना निवेदन

नांदेड जिल्हा प्रतिनिधी (वैभव घाटे)

यंदाच्या खरीप हंगामात विशेषतः जुलैच्या शेवटी व ऑक्टोबर च्या सुरुवातीला नांदेड जिल्ह्यात झालेल्या १४४ मिमी पावसामुळे जिल्ह्यातील १६ पैकी १२ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.अवेळी झालेल्या या अवकाळी पावसामुळे तूर,मूग,सोयाबीन,फळबागा,भाजीपाला,पिके ,आणि उडदालाही मोठा फटका बसला आहे.आधीच विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पावसाने पळवल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे यासाठी नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रात लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करून पावसामुळे झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत. व एकरी किमान पंचवीस हजार रुपयांची नुकसान भरपाई शासनाने शेतकऱ्यांना द्यावी.बिलोली तालुक्यातील आरळी येथील पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्या शादुल शेख यांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी. व या आस्मानी संकटातून शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढावं अशी मागणी इंडियन पँथर सेना या सामाजिक संघटनेनं राज्यपालांना नांदेड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पँथर प्रमुख संविधान दुगाने यांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनात केली आहे.
मराठवाड्यामध्ये सरासरी ४६ लाख हेक्टरवर खरीप पेरणी होती यंदा विभागातील काही जिल्ह्यामध्ये झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे साडेतीन ते सहा हजार हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा.शेतकऱ्यांना सरसकट विमा भरपाई,भरीव आर्थिक मदत देण्याची गरज असल्याचे मत दुगाने यांनी व्यक्त केले.

पंचनामा करण्यास विलंब झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा इंडियन पँथर सेनेनं दिला आहे.ऑक्टोबर मध्ये पावसाने कहर केला आहे. सततच्या पावसात भिजल्याने काढणीस आलेले,कापणी करून शेतात ठेवलेले सोयाबीन, वेचणीस आलेल्या कापूस,कणसातील ज्वारी,फळपिके व मळणी न झालेल्या सोयाबीन चे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी ही शेतकऱ्याने फाटक्या कपड्यावर,गोड धोड खण्याविना अंधारात झाली आहे. तर बिलोली तालुक्यातील आरळी गावातील शेतकरी शादुल महेबूब शेख वय वर्ष ४० व त्याचा सतरा वर्षाचा मुलगा मेहराज शेख २८ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता शेतातील सोयाबीन पावसात भिजत असल्याने ते झाकण्यासाठी गेले असता नाला ओलांडताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही पाण्यात वाहुन जाऊन ऐन दिवाळीच्या दिवशीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.त्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्या कुटूंबास शासनाने किमान २५ लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी इंडियन पँथर सेना प्रमुख संविधान दुगाने,अमोल मठपती,योगेश अमिलकंठवार,कृष्णा गायकवाड,साईनाथ भद्रिया,मोहम्मद खादर अन्सारी,शुभम, सिकंदर शेख, दीपक हटकर आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Back to top button