World

आणि गुगलने दिली पहिल्या मुस्लिम शिक्षिकेला मानवंदना…!

आणि गुगलने दिली पहिल्या मुस्लिम शिक्षिकेला मानवंदना…!

आज भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांची आज १९१ वी जयंती आहे. या पार्श्वभूमीवर गुगलने त्यांच्या फोटो चे डूडल बनवून त्यांना मानवंदना दिली आहे. सर्च इंजिन गुगलनं (Google) आज पहिल्या भारतीय मुस्लीम शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त डुडलमधून (Doodle) अभिवादन केलं आहे. फातिमा शेख यांनी शिक्षणासोबत स्रियांच्या प्रश्नावर देखील काम केलं.महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासोबत फातिमा शेख यांनी काम केलं. फातिमा शेख यांचा जन्म 9 जानेवारी 1831 रोजी पुण्यामध्ये झाला.समाजसुधारक ज्ञानसूर्य ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासोबत फातिमा शेख यांनी १८४८ मध्ये देशातील पहिली मुलींची शाळा सुरु केली. त्या त्यांच्या भावासोबत उस्मानसोबत राहत होत्या. दीनदुबळ्या आणि गरीबांच्या शिक्षणाला विरोध केल्याने फुले दाम्पत्याला वडिलांनी घराबाहेर काढले तेव्हा उस्मान शेख आणि फातिमा यांनी त्यांना आश्रय दिला.
शेख यांच्या घरी स्वदेशी वाचनालयाची स्थापना झाली. इथूनच फातिमा शेख आणि फुले दाम्पत्याने समाजातील गरीब, वंचित घटक आणि मुस्लिम महिलांना शिक्षण देण्याचे काम सुरू केले.
फातिमा घरोघरी जाऊन मुलांना आपल्या घरी अभ्यासासाठी बोलवायच्या. वंचित मुलांनी भारतीय जातिव्यवस्थेचे अडथळे पार करून वाचनालयात येऊन अभ्यास करावा अशी त्यांची इच्छा होती. फुले दाम्पत्याप्रमाणेच त्याही आयुष्यभर शिक्षण आणि समतेच्या संघर्षात गुंतल्या होत्या. या मोहिमेत त्यांना मोठ्या अडथळ्यांचाही सामना करावा लागला. समाजातील प्रभावशाली वर्गाने त्यांच्या कामात अडथळे आणले. त्यांचा छळ झाला, पण शेख व त्याच्या साथीदारांनी हार मानली नाही.

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासोबत काम..

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात 1848 मध्ये सुरु केलेल्या पहिल्या शाळेत फातिमा शेख शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरु केल्यानंतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना घर सोडावं लागलं होतं त्यावेळी फातिमा शेख यांचा भाऊ उस्मान शेख यांनी त्यांना राहण्यास जागा दिली होती. फातिमा शेख यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्यानं शिक्षणाच्या कामाला सुरुवात केली. वर्ग, धर्म आणि लिंग मुळं शिक्षण नाकारलं गेलेल्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी काम केलं.

समतेसाठी कार्यरत..

फातिमा शेख यांनी आयुष्यभर समता या तत्वाच्या प्रसारासाठी काम केलं. त्यांनी दारोदार जाऊन शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्याचं काम केलं. सावित्रीबाई फुले यांच्या प्रमाणं फातिमा शेख यांना तत्कालीन समाजातील प्रस्थापित वर्गाकडून त्रास सहन करावा लागला. फातिमा शेख यांनी सत्यशोधक समाजाचं देखील काम केलं. भारत सरकारनं फातिमा शेख यांच्यांवरील धडा आणि छायाचित्र 2014 मध्ये उर्दू पुस्तकांमध्ये समाविष्ट केला होता.

सावित्रीबाई फुले यांच्या पत्रात उल्लेख..

सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांना 10 ऑक्टोबर 1856 मध्ये रोजी एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रामध्ये त्यांनी फातिमा शेख यांचा उल्लेख केल्याचं दिसून येतं. सावित्रीबाई फुले यांनी स्वत:च्या तब्येतीविषयी जोतिबा फुले यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रात सावित्रीबाई फुले यांनी “फातिमाला त्रास पडत असेल पण ती कुरकूर करणार नाही” असं लिहिलं आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button