यवतमाळ

आमशेत येथे बिरसा मुंडा जयंती साजरी :-

आमशेत येथे बिरसा मुंडा जयंती साजरी :-
गुरुदेव युवा संघाच्या वतीने महिलांना साडीचोळी व विदयार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

रुस्तम शेख

दारव्हा तालुका :-यवतमाळ जिल्हयात दारव्हा तालुक्यातील आमशेत येथे गुरुदेव युवा संघाच्या वतीने क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम हे उपस्थित होते.
यावेळी गणेश कोवे, उध्दव वामन मेश्राम, आकाश पुलसंगे, विठोबा कुळसंगे, नरेंद्र जाधव आदी उपस्थित होते.यावेळी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष यांनी मनोज गेडाम यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनावर उपस्थित विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलतांना म्हणाले की, बिरसा मुंडा यांचा जन्म़ उलिहातू या गावी १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला. त्यांचे शिक्षण जर्मन मिशननरी स्कूल मध्ये झाले. सगळ्यांमध्ये मिळून- मिसळून राहण्याचा बिरसाचा स्वभाव होता. त्यामुळे तरुण वयात त्यांनी समवयस्क आणि समविचारी सहकार्यांचे संघटन केले.
बिरसांना आपल्या वडिलांचे सुगन मुंडांचे जबरदस्तीने धर्मांतरण केल्याबद्दल ख्रिस्ती मिशनऱ्यांचा व इंग्रजांचा मनस्वी राग येत असे. त्यातच अशिक्षित आदिवासींवर इंग्रजांकडून होणारा अत्याचार पाहून इंग्रज अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा विचार त्यांनी केला. बिरसा मुंडांनी गोडगेडा गावातील स्वामी आनंद पांडे यांना गुरुस्थानी मानले होते. त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्याच्या बळावर इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात बिरसा मुंडाने छोटा नागपूर क्षेत्रात इ.स १८९५ साली लढा उभारला.
इंग्रजांनी त्याला अटक केली व तुरुंगात अतोनात छळ केला. ९ जून १९०० रोजी बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहात मृत्यू झाला. बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक हा किताब बहाल केला. विदयार्थ्यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावरुन प्रेरणा घ्यावी असे सांगितले. तसेच गावात पुढील वर्षी बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारणार असल्याचे सांगितले.या कार्यक्रमादरम्यान गुरुदेव युवा संघाच्या वतीने मनोज गेडाम यांच्या हस्ते महिलांना साडीचोळीचे वाटप करण्यात आले. तर उपस्थित विदयार्थ्यांना शालेय साहित्य़ वितरण करण्यात आले. यावेळी आमशेत येथील गावक-यांनी मनोज गेडाम यांचा जाहिर सत्कार केला.
या कार्यक्रमाला रुक्मा कोवे, गणेश कानपूरे, विठोबा मोरे, जयसिंग राठोड, प्रकाश राठोड, विष्णु शिकरे, तुळशीदास शिकरे, लाला साबळे, प्रल्हाद खंडारे, रुक्मा गायकवाड, व्दारकाबाई शिकरे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button