Amalner

Amalner: खा शि निवडणूक….दानशूर भांडारकर कुटुंबाचा खा शि च्या जडणघडणीत सिंहाचा वाटा…!

Amalner: खा शि निवडणूक….दानशूर भांडारकर कुटुंबाचा खा शि च्या जडणघडणीत सिंहाचा वाटा…!

अमळनेर येथील संयुक्त् खान्देशातील नावांजलेली शैक्षणिक संस्था म्हणून खान्देश शिक्षण मंडळ मागील 100 वर्षापासून कार्यरत आहे. सध्या या संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक आज दि.13 फेबु्वारी 2022 रोजी संपन्न होत आहे.

निवडणूक म्हटली की, आरोप-प्रत्यारोप होणारच आणि त्या आरोप-प्रत्यारोपाची आम्हाला काहीएक घेणं-देणं नाही, ज्यांच्या त्यांच्या कर्माची फळे जो तो भोगतोच आणि ती भोग्ाल्याशिवाय त्याची सुटका नसते. या निवडणूकीमध्ये सत्ताधाऱ्यांचं आशिर्वाद पॅनल विरूध्द सहकार पॅनल हे एकमेकांच्या विरूध्द मोठ्या जोमाने ही निवडणूक लढवित आहेत. परंतु सत्ताधाऱ्यांनी निवडणूकीदरम्यान एक पत्रक काढलेले आहे. त्या पत्रकात संस्थेचा 100 वर्षापूर्वीचा इतिहास पूर्णपणे चुकीच्या पध्दतीने मतदारांपुढे मांडला आहे. खान्देश शिक्षण मंडळाच्या जडणघडणीत अमळनेरचे दानशूर भांडारकर कुटुंब आणि कै.रावसाहेब बंगाली यांचादेखील सिंहाचा वाटा आहे. इतिहास चुकीचा मांडून मतदारांची दिशाभूल करणे आणि दानशूर भांडारकर कुटुंब व कै.रावसाहेब बंगाली यांचे मोलाचे योगदान झाकून ठेवणे हे कितपत योग्य आहे. त्यासाठी आम्ही हा लेखन प्रपंच करीत आहोत. जेणेकरून मतदारांपुढे खरा इतिहास येऊन आजच्या पिढीला या इतिहासाची खरी माहिती आम्ही करून देत आहोत.
सन 1908 साली प.पू.भावे गुरूजींच्या नेतृत्वाखाली प्रताप हायस्कूलची स्थापना झाली. त्यानंतर सन 1912 साली खान्देश शिक्षण मंडळाची स्थापना पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या धर्तीवर झाली. त्यावेळी श्रीमंत प्रताप शेठजी, कै.रामचंद्रशेठ भांडारकर, कै. गंगारामशेठ भांडारकर, कै.रावसाहेब बंगाली, कै.रामकृष्ण म्हसकर व शहरातील अन्य प्रतिष्ठीत व्यक्तींची भांडारकरांच्या खड्डा जीन येथील जिनींग प्रेसींग फॅक्टरीच्या ऑफिसमध्ये मिटींग झाली व त्याठिकाणी वरील सर्व मंडळीनी देणगी देवून सदर मंडळाची स्थापना केली. या वाटचालीत त्यावेळेचे अमळनेरचे सर्वच प्रतिष्ठीत मंडळी मोठया प्रमाणात सहकार्य करीत होती. खान्देश शिक्षण मंडळाची स्थापना झाल्यानंतर त्याला अधिक बळकटी येण्यासाठी गंगाराम सखाराम हायस्कूलच्या निर्मितीसाठी कै. गंगारामशेठ भांडारकर आणि त्यांच्या परिवारातील कै.दोधूशेठ भांडारकर, कै.आत्मारामशेठ भांडारकर आग्रही होते. त्यावेळेस अमळनेर शहरातील एक हाडाचे शिक्षक कै.तात्यासाहेब डी. एम. वैद्य सर एक खाजगी शाळा चालवित होते. त्यावेळेस कै.गंगारामशेठ भांडारकर यांनी डी.एम. वैद्य सरांना विनंती केली की, आम्ही या शाळेसाठी भरघोस देणगी देतो आणि शाळेसाठी जागाही देतो त्यावेळेस भांडारकर कुटुंबांनी 15000 रूपयांची मोठी देणगी या शाळेसाठी दिली व त्या पैशातून सद्या अस्तित्वात असलेल्या गंगाराम सखाराम हायस्कूल शाळेची जागा एका बोहरी इसमाकडून 3500 रूपयांना खरेदी केली व उर्वरीत रकमेत शाळेची इमारत उभी केली. येथेच न थांबता त्यांनी मोठ्या मनाने कै. डी. एम. वैद्य सरांना शाळेचे पूर्ण अधिकार बहाल केले. रिकु्रटमेंटपासून तर शाळेच्या दैनंदिन कामापर्यंत पूर्ण अधिकार हे वैद्य सरांकडे होते. त्या शाळेला सन 1938 साली गंगाराम सखाराम हायस्कूल हे नांव देण्यात आले आणि ती शाळा खान्देश शिक्षण मंडळात समाविष्ट करण्यात आली.
आपल्या देशात इंग्रजांचे राज्य असल्यामुळे त्यावेळी कै.रामचंद्रशेठ भांडारकर यांनी एक धाडसी निर्णय घेवून न्यु रामचंद्रभाऊ नूतन इंग्लिश हायस्कूल या नावाने एक शाळा सुरू केली. ती शाळा बरीच वर्ष भांडारकर गल्लीतील त्यांच्याच इमारतीत भरत होती. त्या शाळेला तत्कालीन अधिकाऱ्यांनी लगेच मान्यता दिली. पुढे ती शाळा खान्देश शिक्षण मंडळाच्या यादीतून कशी गायब झाली हा संशोधनाचा विषय आहे. जर ती शाळा आज सुरू ठेवली असती तर ग्रँटेंड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये तिची गणना झाली असती. ती शाळा बंद करण्याचा कुठल्याही जनरल सभेच्या मिटींगमध्ये विषय असल्याचे दिसून येत नाही. गंगाराम सखाराम हायस्कूल सुरू होण्याअगोदर सन 1932, 1934, 1936 या तीन वर्षात प्रताप कॉलेज सुरू होवून लगेच बंद पडले. परंतु 1938 साली त्याला शासकीय मान्यता मिळाली. प्रताप कॉलेजची स्थापना वरील उल्लेख केलेल्या सर्व मंडळी व गावातील इतर मंडळीनी वर्गणी गोळा करून केली. त्यात निःसंशय श्रीमंत प्रताप शेठजींचा सिंहाचा वाटा होता. प्रताप हायस्कूल आणि प्रताप कॉलेजसाठी कै.रावसाहेब बंगाली यांनी 11 एकर जागा दान केली. त्या रावसाहेब बंगालीचे नांव प्रताप कॉलेजच्या लायब्ररीला देण्यात आलेले आहे आजही कै.रावसाहेब बंगाली लायब्ररी म्हणून अस्तित्वात आहे. दि.20 जून 1945 रोजी त्यावेळेचे जळगांव जिल्ह्याचे कलेक्टर रॉथफिल्ड यांच्या नेतृत्वाखाली प्रताप कॉलेज सुरू झाले. मि.रॉथफिल्ड हे त्यावेळेस खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते आणि उपाध्यक्ष श्रीमंत प्रताप शेठजी हे होते. आज या कॉलेजला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत.
कै.रामचंद्रशेठ भांडारकर यांच्या सुविद्य पत्नी कै.द्रौपदीबाई रामचंद्रशेठ भांडारकर यांनी आपल्या पांचहि मुलांना (कै.भिकाजीशेठ, कै.छगनशेठ, कै.मगनशेठ, कै.काशिनाथशेठ आणि कै.लक्ष्मणशेठ) अमळनेर शहरामध्ये मुलींसाठी एक स्वतंत्र शाळा हवी अशी इच्छा आपल्या मुलांसमोर मांडली. मातोश्रीच्या इच्छेला मान देवून पांचहि भावांनी द्रौपदीबाई रामचंद्रशेठ कन्या हायस्कूलची स्थापना केली. सदरची शाळा सुरूवातीला भागवत रोडवरील तंबोली बिल्डींगमध्ये भरत होती. त्या शाळेसाठी भांडारकरांनी 40000 रूपये रोख देणगी देवून सध्या शाळा ज्याठिकाणी आहे त्याठिकाणी स्वतःच्या जागेत इमारत उभी केली. शाळेचे पहिले मुख्याध्यापक म्हणून कै. का.प्र.पुराणिक हे होते. त्या शाळेवर सुरूवातीच्या काळापासून तर खान्देश शिक्षण मंडळात विलीन होईपर्यंत भांडारकर परिवाराची मॅनेजमेंट होती. त्याचा भुमीपूजन सोहळा सन 1944 साली श्रीमंत प्रतापशेठजीं यांच्या हस्ते भांडारकर परिवाराच्या उपस्थितीत करण्यात आली. याप्रमाणे महाभारतात पांच पांडवानी स्वतःच्या कर्तृत्वाने विजयी यज्ञकुंड करून दाखविला त्या विजयासाठी त्यांना प्रोत्साहन देणारी त्यांची माता कुंतीदेवीच होती. त्याचप्रमाणे भांडारकरांच्या पांच पांडवांनी आपल्या मातोश्रीची इच्छा पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक यज्ञकुंड पेटविला. तो यज्ञकुंड आजही मोठ्या दिमाखाने उभा आहे. या शाळेतून आजपर्यंत हजारों मुलींनी शिक्षण घेवून विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.
गंगाराम सखाराम हायस्कूल, न्यू रामचंद्रभाऊ नूतन इंग्लिश स्कूल, श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्रशेठ कन्या शाळा या नंतर भांडारकर परिवाराने साधारण सन 2000 मध्ये श्रीमती सुभद्राबाई पंढरीनाथशेठ भांडारकर या नांवाने प्राथमिक विद्यालयास भरघोस देणगी देवून आपले नांव दिले. ही परंपरा येथेच न थांबता सन 2019-20 साली खान्देश शिक्षण मंडळाच्या डी-फार्मसी कॉलेजला रूपये 1100000 लाखांची देणगी देवून कै.पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर डी-फार्मसी कॉलेज असे नामकरण केले. कै.पंढरीनाथांचे सुपुत्र श्री शरद भांडारकर यांनी उदार हस्ते सदरची देणगी दिली. भांडारकर परिवाराचे आणि खान्देश शिक्षण मंडळाचे हे अजोड नातं जर कोणी इतिहासाच्या रूपाने बदलविण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याची गय भांडारकर परिवार कदापी करणार नाही. त्याचबरोबर अमळनेरचे सुज्ञ नागरीक व सन्माननिय सभासद हे सुध्दा असे करणाऱ्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. जर या संस्थेवर भांडारकर परिवाराला आपले अस्तित्व कायम स्वरूपी टिकवायचे असते तर तत्कालीन परिवारातील लोकांनी त्याठिकाणी कायमस्वरूपी आम्हीच राहू असा आग्रह धरला असता. परंतु दान-देणगी हे निस्वार्थीपणे देण्याची शिकवण परिवारात असल्यामुळे असे दुसऱ्यांचे हक्क डावलून लोकांना भूलथापा देवून आणि इतिहास बदलवून कोणीही मोठा होवू शकत नाही हा इतिहास लोकांपुढे आणण्याचा प्रपंच म्हणजे आमच्या परिवाराचे मोठेपण जगापुढे आणणं असा नसून खान्देश शिक्षण मंडळाचा सत्य इतिहास काय आहे हा आजच्या पिढीला कळावा एवढ्याच भावनेने सदरचा खुलासा करीत आहोत. याचबरोबर फक्त शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर धार्मिक व सामाजिक कार्यात सुध्दा त्यांचा पुढाकार असल्याचे दिसून येते. पैलाडचे शनि मंदिर, अमरधाम, फि लासॉफी सेंटर अशा विविध कार्यासाठी त्याकाळात स्वतःच्या जागा समाजासाठी भांडारकर कुटुंबाने दान केल्या.
श्रीमंत प्रतापशेठजींचे मोठेपण हे निविर्वाद आहे यात कोणतीच शंका नाही, परंतु खान्देश शिक्षण मंडळाच्या जडणघडणीत प्रतापशेठजी यांच्या खांद्याला खांदा लावून भांडारकर परिवाराचे योगदान हे काकंणभर जास्तच आहे. सत्ताधाऱ्यांकडून चुकीचा इतिहास समाजापुढे आणला जात असल्यामुळे सत्यता लोकांपुढे यावी एवढया प्रामाणिक हेतूने वरील माहिती योग्य त्या कागदपत्रांच्या आधारावर आपणांपुढे मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button