Amalner: कलाली येथे ऊसाचे शेत जळून खाक..!
अमळनेर तालुक्यातील कलाली येथील शेतात इलेक्ट्रीक तारांच्या शार्टसर्कीटमुळे ऊसासह ठिंबक नळ्या जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. यात सुमारे साडे तीन लाखांचे नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील प्रकाश धनसिंग पाटील (वय-५२) रा. कलाली ता. अमळनेर यांचे कलाली शिवारातील गट नंबर ६०/२/अ मध्ये शेत आहे. त्यांनी शेतात ऊसाची लागवड केली होती. शनिवार ५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शेतातून गेलेल्या महावितरण कंपनीच्या ताराच्या शार्टसर्कीटमुळे ऊसाला आग लागली. या आगीत शेतातील ऊस आणि ठिंबक नळ्या जळून खाक झाल्या आहेत. यात सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती प्रकाश पाटील यांनी दिली आहे. सदर आग लागताच गावातील पद्माकर दत्तात्रय पाटील यांनी अमळनेर नगरपालिकेचा अग्नीशमन बंब बोलाऊन आग विझविण्यात आली. प्रकाश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असूनतपास पो हे कॉ संजय पाटील करत आहे.