Nashik

केंद्रीय योजनांची जनजागृती करावी – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

केंद्रीय योजनांची जनजागृती करावी – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक -नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी यंत्रणांनी कायमस्वरुपी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. तसेच केंद्रीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नियोजन सभागृहात दिशा समितीच्या बैठकीत केंद्रीय योजनांचा आढावा घेतांना केंद्रीय राज्यमंत्री डॉ पवार बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांच्यासह विविध यंत्रणांचे विभाग प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
डॉ. भारती पवार म्हणाल्या, ग्रामीण भागात आरोग्याचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व उप केंद्रे सक्षम करण्यात यावी. तसेच ज्या आरोग्य केंद्राच्या इमारती जुन्या झाल्या असतील त्यांचे नुतनीकरण करण्यात यावे. जिल्ह्यात ४१० हेल्थवेलनेस सेंटर असून वैद्यकीय महाविद्यालय, संदर्भ रुग्णालयातही आरोग्य केंद्रे जोडण्यात यावीत. ग्रामीण भागातील प्रत्येकाला आरोग्य सुविधा उपलब्ध होतील यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे मातृत्व वंदना, जननी सुरक्षा, जननी शिशु सुरक्षा योजनांचा लाभ जास्तीत जास्त महिलांना होण्यासाठी या योजना संदर्भात जनजागृती करण्यासाठी प्रत्येक ग्रामीण, प्राथमिक, उपविभागीय आरोग्य केंद्रांमध्ये माहिती फलक लावण्यात यावेत, अशा सूचनाही डॉ. पवार यांनी दिल्या.
दिव्यांग व्यक्तिंना प्रमाणपत्रांचे वाटप वेळेत होण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात यावे. जेणेकरून त्यांच्यासाठी असणाऱ्या योजनांपासून ते वंचित राहणार नाहीत, यासाठी जबाबदारी निश्चित करुन नियोजन करण्याच्या सूचनाही डॉ. पवार यांनी यावेळी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.
प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२१ -२२ वर्षात साधारण १ लाख ४१ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला असून यातील ८९ हजार ३५७ शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली होती. यातील पीक विम्याचा लाभ न मिळालेच्या शेतकऱ्यांची स्वतंत्र यादी तयार करण्यात येवून त्यांनाही लाभ कसा देता येईल यासाठी प्रयत्न करण्यात यावा असे सांगून
त्याचप्रमाणे २०२२-२३ या वर्षासाठी १ लाख ६५ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला असून याअंतर्गत साधारण १ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित होणार आहे. पीक विमा योजनेंतर्गत संबंधित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी नियोजन करावे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत २०२१-२२ मध्ये साधारण १७ कोटींचे अनुदान वाटप करण्यात आले आहे, असेही डॉ. पवार यांनी सांगितले.रोजगारासाठी कुटुंबासोबत बालकांचे स्थलांतर होत असते. या बालकांचे कुषोषण टाळून त्यांच्यातील अतितीव्र व मध्यम कुपोषित बालके शोधण्यासाठी नंदूरबारच्या धर्तीवर कॅप विकसित करण्यात यावा. जेणेकरुन या कॅपच्या माध्यमातून बालकांच्या पोषण आहार आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते नियोजन करता येईल. तसेच स्थलांतरीत कुटुंबाना घरकुल योजना, जनधन योजना, मनरेगा अशा विविध योजनांच्या माध्यमातून लाभ उपलब्ध करुन देण्यात यावा. तसेच अंगणवाडीच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या पोषण आहार उपक्रमातून अतितीव्र व मध्यम कुपोषित बालकांना चांगला परिणाम दिसून येत आहे, असेही यावेळी डॉ. पवार यांनी सांगितले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button