Nandurbar

मनरेगाच्या माध्यमातून 21 लाख मनुष्य दिवस निर्मिती

मनरेगाच्या माध्यमातून 21 लाख मनुष्य दिवस निर्मिती

फहिम शेख

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.22: नंदुरबार जिल्ह्यात लॉकडाऊन परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य दिल्याने मागील सहा महिन्यात 21 लाख 30 हजार मनुष्य दिवस निर्माण झाले आहेत. गेल्या संपूर्ण वर्षाच्या तुलनेत गेल्या तीन महिन्यातच 44 टक्के खर्च झाला असून 41 टक्के मनुष्य दिवस निर्मिती झाली आहे.

मनरेगा अंतर्गत अधिकाधिक मजूरांना काम देण्यासाठी प्रशासनाने गाव पातळीवर सूक्ष्म नियोजन केले. यंत्रणानिहाय कामांचे नियोजन करून या मोहिमेला गती प्रदान करण्यात आली. यामुळे संकटाच्या परिस्थितीत एकाच दिवशी 64 हजारपेक्षा अधिक मजूरांना रोजगार मिळाला.

मनरेगा अंतर्गत गेल्या आर्थिक वर्षात एकूण 66 कोटी 95 लाख खर्च झाला होता आणि एकूण 25 लाख 32 हजार मनुष्य दिवस निर्माण झाले होते. चालू आर्थिक वर्षात पहिल्या 6 महिन्यातच 58 कोटी 35 लाख एवढा निधी खर्च करण्यात आला असून 21 लाख 30 हजार मनुष्य दिवस निर्माण झाले आहेत. मे महिन्यात एकाचवेळी 47 हजार 488 कुटुंबातील व्यक्तींना रोजगार प्राप्त झाला होता.

गेल्यावर्षीच्या मनुष्य दिवसाच्या तुलनेत या वर्षात 84 टक्के मनुष्य दिवस निर्मिती ही केवळ मागील सहा महिन्यात साध्य करण्यात आली आहे. तर मागील वर्षीच्या तुलनेत 87 टक्के खर्च केवळ मागील तीन महिन्यातच्या कालावधीत करण्यात आला आहे.

मनरेगाच्या कामात ग्रामपंचायत, वने, सामाजिक वनीकरण, कृषी आदी विविध विभागांनी कामे हाती घेतली आहेत. उन्हाळ्यात गाळ काढण्याची कामे मोठ्या प्रमाणात घेण्यात आली. त्यावर 5 कोटी खर्च करण्यात आला. या कामांमुळे जलस्त्रोतातील पाणीसाठा वाढला असून त्याचा लाभ परिसरातील नागरिकांना होणार आहे. पावसाळ्यात वृक्षारोपण, नर्सरी, फळझाडे लागवड आदी कामांना प्राधान्य देण्यात आले. मनरेगाच्या अंतर्गत घरकूल बांधणीच्या कामांनाही वेग देण्यात आला.

कोरोना संकटामुळे अनेकांचे रोजगार गेले असताना अधिकाधिक मजूरांना काम देण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. मनरेगाच्या माध्यमातून गावाच्या विकासाची कामे व्हावीत असेदेखील प्रयत्न करण्यात येत असून त्यासाठी नागरिकांच्या प्रबोधनावरही भर दिला जात आहे. एकंदरीत ही योजना संकटकाळात नागरिकांना दिलासा देणारी ठरली आहे.

येत्या काळात डीएम फेलोजच्या सहकार्याने अधिक स्थलांतर होणाऱ्या प्रत्येक गावात नर्सरी तयार करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. इतर रोपांबरोबर फळझाडांची लागवडदेखील येत्या पावसाळ्यात करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मनरेगाच्या माध्यमातून गावातच रोजगार उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button