Karad

? धक्कादायक…वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या समोरच एकावर सपासप वार, पोलिस ठाण्यात खळबळ

? धक्कादायक…वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या समोरच एकावर सपासप वार, पोलिस ठाण्यात खळबळ

कराड : चौकशीसाठी बोलवण्यात आलेल्या एका संशयिताने एकावर वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसमोर फिल्मी स्टाईलने सपासप वार केल्याची खळबळजनक घटना कराड पोलीस ठाण्यात घडली आहे. ही घटना आज (सोमवार) सकाळी अकरा ते बाराच्या सुमारास वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या दालनात घडली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी.आर. पाटील यांच्यासमोर संशयिताने चाकूने एकावर तीन वार केले. पाटील यांनी प्रसंगावधान राखत आरोपीला जागेवरच ताब्यात घेतले. या घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
लखन भागवत माने (वय-40 रा. हजारमाची, ता. कराड) असे चाकू हल्ला करणाऱ्या संशयीताचे नाव आहे. तर किशोर पांडूरंग शिखरे (वय-27 रा.
हाजारमाची, ता. कराड) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून शिखरे यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखन माने आणि किशोर शिखरे यांच्यामध्ये पूर्वीपासून वाद आहेत. याच वादातून लखन माने हा पंढरपूर येथे वास्तव्यास गेला होता. तो पंढरपूर येथे स्थायिक होणार होता. पंढरपूर येथे रहात असताना तो किशोर शिखरे याच्या वडीलांशी नेहमी बोलत होता. शिखरे याने लखनला आपल्या वडीलांशी बोलून नको असे सांगितले. यावरुनही त्यांच्यात वाद झाला होता. याचा राग मनात धरुन लखन याने 25 फेब्रुवारीला दुपारी दोनच्या सुमारास फोन करुन शिखरेला तुझा गेम करणार अशी धमकी दिली. त्यानंतर शिखरे याने 26 फेब्रुवारी रोजी पोलिसांत तक्रार केली. लखन माने हा पंढरपूर येथे असल्याने पोलिसांनी त्याला आज चौकशीसाठी बोलवले होते.
सकाळी अकराच्या सुमारास माने पोलीस ठाण्यात आला. त्याला पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील यांच्या दालनात नेण्यात आले. पाटील यांनी शिखरे याने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने माने याच्याकडे चौकशी केली. माने याचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पाटील यांनी शिखरे याला बोलवण्यास सांगितले. काही वेळाने शिखरे पोलीस ठाण्यात आला. त्याला पोलिस निरीक्षकांच्या दालनात नेण्यात आले. त्यावेळी माने हा बाहेर बसला होता.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी.आर. पाटील हे किशोर शिखरे याच्याकडे चौकशी करत असताना अचानक माने पोलिस निरीक्षकांच्या दालनात आला. त्याने सोबत आणलेल्या चाकूने शिखरे याच्यावर सपासप वार केले. प्रसंगावधान राखत पाटील यांनी माने याला ताब्यात घेतले. काही क्षणात माने याने शिखरे याच्यावर तीन वार केले. शिखरे याच्या हात, मान आणि पाठीवर चाकूने वार करण्यात आले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने शिखरे याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, हा प्रकार घडल्याचे समजताच पोलिस ठाण्यातील इतर कर्मचाऱ्यांनी पोलिस निरीक्षकांच्या दालनाकडे धाव घेतली. त्यांनी माने याला ताब्यात घेतले. जखमी शिखरे याच्यावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. पोलीस शिखरे याची फिर्याद घेण्याचे काम करत आहेत.

Leave a Reply

Back to top button