Amalner

?️ अमळनेर कट्टा … पातोंडा जळोद शिवारात विटभट्ट्यांसाठी हिरव्यागार झाडांची बेसूमार कत्तल लाकूड शेतात उपसून वनविभागाच्या हातावर तुरी

?️ अमळनेर कट्टा … पातोंडा जळोद शिवारात विटभट्ट्यांसाठी हिरव्यागार झाडांची बेसूमार कत्तल लाकूड शेतात उपसून वनविभागाच्या हातावर तुरी
पातोंडा ता.अमळनेर – येथे आज पातोंडा परीसर विकास मंच च्या कार्यकर्त्यांनी लाकडांचे भरलेले ट्रॅक्टर पकडून पुढिल कारवाई करीता वनविभागाच्या ताब्यात दिले. एकीकडे शासन स्तरावरून वृक्ष लागवडीस प्रोत्साहन मिळावे म्हणून बिहार पॅटर्न व मियावाकी पध्दत यासारख्या योजना राबवून लाखो रूपये खर्च करत असतांना काही समाज विघातक वृत्तीचे लोक बेसुमार वृक्षतोड करीत असल्याचे दिसून येत आहे.
जळोद शिवारातून लाकडांनी भरलेले ट्रॅक्टर पातोंडा येथून जात असतांना संशय आल्यावर विकास मंचचे कार्यकर्ते राजन बिरारी यांनी त्याला थांबवले असता त्यात सहा ते आठ मोठमोठ्या हिरव्यागार निंब व बाभळाच्या वृक्षांची लाकडे आढळून आली. विकास मंचच्या कार्यकर्त्यांनी सदर वृक्षतोड करणारा चांद पिंजारी याला याबाबत विचारणा केली असता शेतशिवारातून जाणा-या विजतारांना अडथळे ठरणा-या वृक्षांच्या फांद्या छाटण्याचे काम आम्हाला जळोद येथील वायरमन यांनी सांगितले परंतू सदर व्यक्तींनी फक्त फांद्या न छाटता संपूर्ण झाडच कापून आल्याचे निदर्शनास आले. सदर वृक्षतोड हि यंत्रांच्या सहाय्याने करण्यात येत असल्याने वृक्षतोड करणारे खुपच निर्ढावले असल्याचे समजते. सदर लाकूड हे विटभट्ट्यांकरीता असल्याचे देखील त्याने कबूल केले. पातोंडा ते चोपडा दरम्यान भरपूर विटभट्टे असून यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात सरपण लागते व ती गरज भागवण्यासाठी बेसुमार वृक्षतोड केली जाते. विकासमंच कार्यकर्त्यांनी अमळनेर वनपाल बोरसे यांच्याशी संपर्क करून माहिती दिली असता त्यांनी वनकर्मचारी ज्ञानेश्वर पाटील यांना घटनास्थळी पाठवले. विकास मंचच्या कार्यकर्ते राजन बिरारी , घनशाम पाटील , सोपान लोहार, राकेश पाटील , रत्नाकर पवार , नरेंद्र सैंदाणे व तरूणांनी सदर लाकडांनी भरलेले ट्रॅक्टर मुद्देमालासह वनकर्मचारी ज्ञानेश्वर पाटील यांच्या हवाली केले.
रस्त्यावर लाकूड उपसून लाकूडतोड करणारे पसार –
वनकर्मचारी ज्ञानेश्वर पाटील हे ट्रॅक्टर पुढील कारवाई करीता अमळनेर येथे घेऊन जात असतांना दहिवद फाट्याच्या पुढे लाकूड तोड करणा-याच्या दोन ते तिन माणसांनी वनकर्मचारी यांना पकडून ठेवले व ट्रॅक्टर मधील सर्व लाकूड शेतात उपसून पसार झाले. वनकर्मचारी यांनी पाठलाग केला असता आपली मोटरसायकल तेथेच टाकून लाकूड तोड करणा-याच्या साथीदारांनी तेथून पोबारा केला. या घटनेची माहिती कळताच वनपाल बोरसे घटनास्थळी पोहचले. वनपाल यांचेशी संपर्क साधला असता सदर लाकूड हे जप्त करून अमळनेर येथे दुस-या वाहनाने नेण्यात येईल व संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती दिली. परंतू दोन ते तिन दिवसांपूर्वी खौशी रस्त्याला लागून असलेल्या शेतात वृक्षतोड होत असल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली होती परंतू त्याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही , म्हणून सदर बाबतीत खरोखर कारवाई होते किंवा नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
फोटो – लाकडांनी भरलेले ट्रॅक्टर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button