Pune

दशरथ यादव यांची चौकटीबाहेरची प्रेमकथा ,,फाटक,, रुपेरी पडद्यावर

दशरथ यादव यांची चौकटीबाहेरची

प्रेमकथा ,,फाटक,, रुपेरी पडद्यावर

दौंड परिसरात चित्रपटाचे चित्रीकरण सुरु

राहुल खरात

पुणे, ता. १ : प्रसिद्ध साहित्यिक दशरथ यादव यांची फाटक कांदबरी जीएसएम फिल्म च्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर येत आहे. ग्रामीण जीवनाचे अस्सल दर्शन घडविणारी चौकटी बाहेरची प्रेमकथा चित्रपटातून रसिकांच्या भेटीला येत आहे.

फाटक या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच दौंड तालुक्यातील पाटस, गार, येडेवाडी, भीमानदी नदी यापरिसरात झाले. शरद गोरे यांचे दिग्दर्शन असून कथा, पटकथा, संवाद श्री यादव यांचे आहेत. सहाय्य संतोष गव्हाणे. आघाडीचे कलाकार प्रकाश धिंडले, सुषमा पाटील नायक नायिकेच्या भूमिकेत प्रथमच पडदयावर येत आहे. रमाकांत सुतार यांचा कसदार अभियन, शरद गोरे यांनी रंगविलेला रंगाशेठ ही खलनायकाची व्यक्तीरेखा रसिकांच्या पसंतीला उतरेल. याशिवाय नितीन पाटील, फुलचंद नागटिळक, गणेश शिंदे, स्वाती सुतार, सुनील साबळे, रशिद काजी, संजय सोनवणे, विजय तुपे, कृष्णा खबाले, गोविंदा, अक्षय, सोनू पवार, चिल्या चौधरी, स्नेहा यांच्याही महत्वपुर्ण भूमिका आहेत. मराठी चित्रपटाच्या पटलावर या सिनेमाच्या निमित्ताने प्रकाश धिंडले आणि सुषमा पाटील ही नायक नायिकेची जोडी रुपेरी पडद्यावर धमाल उडवेल. त्यांनी साकारलेली कोमल आणि मनिषची व्यक्तीरेखा रसिकांना आवडेल.

श्री यादव यांच्या लेखणीतून उतरलेली हटके प्रेमकथा फाटक चित्रपटातून रसिकांच्या पसंतीस उतरेल. ग्रामीण जीवनाचे वास्तव दर्शन फाटकमधून घडते. रेल्वे रुळाच्या आजूबाजूला घडलेली ही चौकटीबाहेरची प्रेमकथा रसिकांच्या काळजाचा ठाव घेईल अशीच आहे.

श्री यादव हे मुळचे माळशिरस (ता.पुरंदर) येथील आहेत. पत्रकारिता हा त्यांचा मुख्य व्यवसाय असला तरी साहित्याच्या क्षेत्रात त्यांनी महत्व पुर्ण काम केले आहे. वारीच्या वाटेवर या ऐतिहासिक महाकादंबरीचे ते लेखक असून, उन्हातला पाऊस, लेखणीचे फुले, गुंठामंत्री, यादवकालीन भुलेश्वर, घुंगुरकथा, बालाघाटचा सिंह, पोवाडा पुरुषोत्तमाचा, शिवधर्मगाथा, साहित्यिक छत्रपती संभाजीराजे, मातकट, सुतसंस्कृती आदी पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे. यापुर्वी रणांगण सिनेमाची पटकथा व संवाद, ढोलकीच्या तालावर सिनेमाचे गीत लेखन, दिंडी निघाली पंढरीला सिनेमाची कथा त्यांची आहे. सत्याची वारी या माहिती पटाचे लेखन त्यांनी केले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून ते कार्यरत असून राज्यभर विविध साहित्य संमेलने भरवीत आहेत. सासव़ड येथे भरलेल्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते राज्याचे प्रवक्ते होते. छत्रपती संभाजी महाराज, आद्यक्रांतीवीर नाईक उमाजीराजे, महात्मा फुले यांच्या नावानेही ते साहित्य संमेलने भरवीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button